परमेश्वराप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-ऊल-अजहा अर्थात बकर ईद शुक्रवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात उत्साही वातावरणात साजरी झाली. यानिमित्ताने बकरे, मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात ‘कुर्बानी’ देण्यात आली. यानिमित्ताने बकऱ्यांच्या बाजारात सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
ईदनिमित्त सकाळी सर्व मशिदी आणि ईदगाह मैदानांवर मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केली. नंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शहरात जुनी मिल पटांगण (आदिलशाही ईदगाह), सिध्देश्वर पेठेतील पानगल प्रशाला पटांगण (आलमगीर ईदगाह), होटगी रस्त्यावरील नवीन आलमगीर ईदगाह, शिवछत्रपती रंगभवनासमोरील अहले हादीस ईदगाह आणि आसार मदान ईदगाह या ठिकाणी सामूहिक नमाजासाठी मुस्लीम बांधवांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. अहले हादीस ईदगाहवर पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही स्वतंत्रपणे नमाज पठण केली. होटगी रोड ईदगाहवर सामूहिक नमाजाचे अधिपत्य करताना शहर काझी मुफ्ती सय्यद अहमद काझी यांनी वैचारिक प्रबोधन केले. आलमगीर ईदगाहवर खुत्ब्याचे वाचन करताना माजी जिल्हा सरकारी वकील अब्बास काझी यांनी सद्य सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषयांवर विवेचन करून मुस्लीम समाजाने शिक्षणाची दोरी पकडून प्रगती साधावी, असे आवाहन केले.
शासनाने राज्यात गोवंशहत्या बंदीचा कायदा लागू केल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रथमच बकरी ईद साजरी होत असताना पोलीस प्रशासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे गोवंश हत्यांचे प्रकार घडल्याचे प्रकार कोठेही घडले नाहीत. तशा तक्रारीही प्राप्त झाल्या नाहीत. विशेषत सध्या साजरा होत असलेल्या गणेशोत्सवामुळे पोलीस प्रशासन अधिक दक्ष राहिल्याचे पाहावयास मिळाले. संशयास्पद परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त होता. मुस्लीम बांधवांनीही कायद्याला मान देत गोवंशाची कुर्बानी करणे जाणीवपूर्वक टाळले. त्याऐवजी बकरा व मेंढ्याची कुर्बानी देणे पसंत केले. त्यामुळे बाजारात बकरे व मेढ्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली. १० किलोपासून ते ५० किलो वजनापर्यंतचे विविध जातींचे बकरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.बक-यांच्या किमती १२ हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत होत्या. यात सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापा-यांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2015 रोजी प्रकाशित
सोलापुरात बकरी ईद उत्साहाने साजरी
ईदनिमित्त सर्व मशिदी आणि ईदगाह मैदानांवर मुस्लीम बांधवांचे एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण
Written by अपर्णा देगावकर
Updated:

First published on: 26-09-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bakara eid celebrated enthusiastically in solapur