महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. तर, सुरक्षा व्यवस्थेतील या जुजबी वाढीमुळे मनेसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“काय थट्टा चालवली आहे? आम्ही काय मागणी करतोय? अन् तुम्ही सुरक्षा काय देत आहात. एखादा इन्स्पेक्टर किंवा हवालदार फक्त सुरक्षेसाठी वाढवून दिला आहे. ज्याला नाही पाहिजे त्याला संरक्षण देत आहात. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना संरक्षणाच्या नावाने वाटण्याच्या अक्षता दाखवत आहात.” असा शब्दांत नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

याचबरोबर, “आम्ही देशाच्या गृहमंत्र्याकडे राज ठाकरे यांना झेड प्लसची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना लेखी स्वरुपात पत्र देखील पाठवले आहे.” असंही नांदगावकर म्हणाले आहेत.