Bala Nandgaonkar on Raj Thackeray & MNS Party Meeting : आपसात कोणत्याही प्रकारचा वाद न ठेवता निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (४ ऑगस्ट) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून केली. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय व मनसेचे नेत बाळा नांदगावकर यांनी मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. नांदगावकर म्हणाले, “लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. संघटनात्मक दृष्टीकोनातून काय काय करायला हवं याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं.
यावेळी नांदगावकर यांना वार्ताहरांनी विचारलं की मनसे व शिवसेना (उबाठा) युतीविषयी काही चर्चा झाली का? किंवा पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्षांना त्याबाबत विचारणा केली का? यावर नांदगावकर म्हणाले, “यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. युतीचा निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील. पदाधिकारी मेळाव्यात युतीचा विषय काढला नव्हता. मात्र, राज ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपण कसं वागतो त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.”
पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे काय म्हणाले?
बाळा नांदगावकर म्हणाले, “राज ठाकरे यांनी आम्हाला सूचना केली आहे की जुन्या कार्यकर्त्यांना तुमच्याबरोबर घ्या. माजी पदाधिकारी, याआधी आपल्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले उमेदवार, सध्या घरी बसलेले कार्यकर्ते या सर्वांना सोबत घ्या. तुमचं पटत नाही, मला तो आवडत नाही असं करून चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा आपला आहे. जो कोणी जुना सहकारी सोबत येत असेल त्याला विश्वासाने सोबत घ्या. त्याला विश्वास द्या की आपण सोबतच वाटचाल करायची आहे.”
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या आढावा बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरे यांनी मतदार यादीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले, आपले जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सोबत घ्या, जुने हेवेदावे सोडून द्या. मतदार याद्यांवर विशेष काम करा, सर्व मतदार याद्या तपासून घ्या.