Balasaheb Thackeray महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंबंधीचे दोन अध्यादेश राज्य सरकारने काढले होते. मात्र तिसरी भाषा ही हिंदी किंवा इतर कुठलीही असेल असा पर्यायही दिला होता. तरीही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला. एवढंच नाही तर सरकारने वाढत्या विरोधानंतर हा अध्यादेश मागे घेतला. मात्र यामुळे एक महत्त्वाची घडामोड घडली. ती घडामोड म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच मंचावर येणं. ही घटना ऐतिहासिक ठरली. दरम्यान आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी भाषेबाबत भूमिका मांडली होती ते समोर आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी काय भूमिका मांडली?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आपल्या भाषणांमध्ये हिंदी या भाषेला विरोध नाही तर हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे असं म्हटलं आहे. या दोघांची आक्रमक भाषणं मुंबईतल्या वरळीमध्ये पार पडली. त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र आणि हिंदुस्थान याबाबत घेतलेल्या भूमिकेचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसंच दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. दरम्यान आता बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी आणि आपला भारत याबाबत एक भाषण केलं होतं. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. आता तोच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे?
“लोकसभेला जेव्हा आमचे कुणी उभे राहतील तेव्हा हिंदुत्वाचा प्रचार करणार, का तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून. महाराष्ट्रावर संकट आल्यानंतर महाराष्ट्रातले प्रश्न आणि देशावर संकट आल्यानंतर देशाचा विचार हे शिवसेनेचं धोरण आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला आंबेडकर आठवतात. एरवी कुणीही कुणाला विचारत नाही, पुसतही नाही पुतळेही उभारत नाही. बहुजन समाजाच्या बाबतीत मला कुणी सांगू नका. माझ्या बापाने त्यासाठी खसता खाल्ल्या आहेत. हिंदुस्थानात आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल तर संपू्र्ण देशात तुम्ही हिंदू आहात. बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण देशात तुम्ही हिंदू आहात. ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. येणारं हिरवं सावट, संकट ते तुम्हाला परतही करता येणार नाही.” असं बाळासाहेब ठाकरे या व्हायरल भाषणात म्हणत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ अनेक वर्षांपूर्वीचा आहे. तो आता महाराष्ट्रातील हिंदी-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला आहे.