नांदेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात मंगळवारी एका विवाह सोहळ्यासाठी नांदेडमध्ये आले होते. हा सोहळा आटोपल्यानंतर येथून मोटारीने देगलूरमार्गे हैदराबादला जात असताना, हळव्या मनाचा हा नेता अडीच वर्षांपूर्वीच्या भारत जोडो यात्रेतील संस्मरणीय आठवणींमध्ये रमला होता.
काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांची कन्या नेहा आणि भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण समर्थक मारोतराव कवळे यांचे पुत्र संदीप यांचा शुभविवाह मंगळवारी सायंकाळी दिग्गजांच्या मांदियाळीत संपन्न झाला, पण थोरात दुपारच्या सत्रातील कौटुंबिक पातळीवरील सोहळ्यास हजर राहिले आणि वधु-वरांस शुभेच्छा देऊन बाराच्या सुमारास हैदराबादकडे रवाना झाले.
नांदेड-देगलूर-संगारेड्डी ते हैदराबाद हा त्यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग होता. अडीच वर्षांपूर्वी खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून प्रथम देगलूरला आणि तेथून नांदेड शहरामध्ये दाखल झाली तेव्हा काँग्रेस पक्षातील वातावरण अतिशय हर्षोत्फुल्ल होते. स्वतः बाळासाहेब यात्रेच्या पूर्वतयारीनिमित्त दोनदा नांदेडला आले होते.
वरील यात्रा महाराष्ट्रात येण्याच्या काही महिने आधी महाविकास आघाडी सरकार पडल्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर होता, तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात्रेचे स्वागत, तसेच राहुल गांधी व भारतयात्रींचा ठिकठिकाणचा मुक्काम, त्यांची भोजनव्यवस्था तसेच यात्रेदरम्यानचे कार्यक्रम-मान्यवरांच्या भेटीगाठी या सर्व बाबींच्या नियोजनात उत्कृष्टता राखली होती.
यात्रेच्या नांदेड जिल्हा आगमनापासून ती हिंगोली जिल्ह्यात जाईपर्यंत बाळासाहेब थोरात त्यांत सहभागी होते. पहिल्या दिवशी देगलूरजवळच्या गुरुद्वारातील दर्शन, नंतर गोदावरी मनार कारखाना परिसरातील मुक्काम, पदयात्रेदरम्यानचे छोटे-मोठे प्रसंग या आणि इतर अनेक आठवणींना त्यांनी वरील प्रवासादरम्यान उजाळा दिल्याचे त्यांच्यासोबत गेलेले पक्षाचे येथील कार्यकर्ते विठ्ठल पावडे यांनी सांगितले.
तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नसतानाही ‘भारत जोडो’ यात्रेमुळे महाराष्ट्रभर उत्साह संचारलेला होता. पण अडीच वर्षांनंतर महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती दयनीय बनली आहे. थोरातांसारख्या बड्या नेत्याला मुंबई-हैदराबाद-नांदेड हा हवाई प्रवास नियमित विमानातून आणि मग रस्तामार्गे हैदराबाद आणि तेथून विमानाने मुंबई अशी कसरत करावी लागली, पण परतीच्या प्रवासात ते जुन्या आठवणींमध्ये चांगलेच रमल्याचे सोबत्यांनी अनुभवले.
अडीच वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला अच्छे दिन आणण्यातला उत्साह, त्यांच्या कन्येचे राजकीय पदार्पण आणि भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषेची लोकसभेची दावेदारी हे सारे ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान ठळक झाले होते. पण मंगळवारी थोरातांसारखा काँग्रेसनिष्ठ नेता काही तास नांदेडमध्ये असताना मागील वर्षी भाजपावासी झालेले खा.अशोक चव्हाण, त्यांची आमदार कन्या श्रीजया आणि त्यांचे समर्थक मात्र भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २६ मेच्या नांदेड दौर्यातील कार्यक्रमांच्या नियोजनात व्यग्र होते. उल्लेखनीय बाब म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा नांदेड जिल्ह्यात येण्याच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. पण त्या काळातील नांदेडमधल्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षांसह थोरात यांनी चव्हाण काँग्रेस सोडून कोठेही जाणार नसल्याचा निर्वाळा दिला होता. पुढे दोन वर्षांनंतर चव्हाण भाजपावासी झाले.
थोरात-चव्हाण भेट नाही !
बाळासाहेब थोरात ज्या विवाह सोहळ्यासाठी येथे आले होते. त्या विवाह सोहळ्याचे खासदार अशोक चव्हाण यांना तर वर-वधू या दोन्ही परिवारांतून सहर्ष निमंत्रण होते. पण दुपारच्या सत्रातील कौटुंबिक सोहळ्यास चव्हाण हजर राहिले नाहीत. त्यामुळे थोरात-चव्हाण भेट टळली; पण भाजपाचे शहराध्यक्ष झालेले काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकरांनी थोरात यांना नमस्कार घालत औपचारिकता पूर्ण केली.