​सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फे सातार्डा येथे सुरू असलेल्या लोहखनिज उत्खननामध्ये गंभीर अनियमितता आढळल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उत्खनन व वाहतूक तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात १२ ऑगस्ट रोजी मे. डेक्कन मिनरल्स प्रा. लि. आणि खाण व्यवस्थापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

​जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी ७ ऑगस्ट रोजी या खाणीची पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. साटेली तर्फे सातार्डा येथील ४०.३७ हेक्टर क्षेत्रातील खाणपट्ट्यामध्ये भूस्खलन (Landslide) झाल्याचे आढळून आले. यामुळे खाणीतील ६ ते ७ बेंच (खननासाठी तयार केलेले टप्पे) कोसळले आहेत. यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी उत्खनन आणि वाहतूक तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत हे कोसळलेले बेंच पुन्हा सुरक्षित केले जात नाहीत, तोपर्यंत खाणकाम सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​या नोटीसमध्ये आणखी काही गंभीर बाबींवर प्रकाश टाकला आहे. सध्या सुरू असलेल्या ४०.३७ हेक्टर खाणीलगतच बंद असलेल्या ५२.१२ हेक्टर आणि २०.२४ हेक्टर क्षेत्रातील खाणपट्ट्यांमध्येही बेकायदेशीर उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः, मागील काही वर्षांमध्ये २०.२४ हेक्टर खाणीमध्ये चुकीच्या पद्धतीने उत्खनन झाल्यामुळे तेथीलही बेंच कोसळले आहेत. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या खाणीतील उत्खननानंतर निघालेला कचरा (रिजेक्शन) बेकायदेशीररित्या बंद असलेल्या २०.२४ हेक्टर खाणीमध्ये टाकल्याचेही आढळले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

​या सर्व प्रकारावरून असे दिसून येते की, ४०.३७ हेक्टर क्षेत्रासाठी परवानगी घेऊन, कंपनीने शेजारच्या दोन्ही बंद खाणींमध्येही बेकायदेशीरपणे खाणकाम केले आहे. हे खाणकाम कोणत्याही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे हे भूस्खलन घडले आहे. यामुळे गावातील लोकवस्तीच्या जीविताला आणि आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

​या सर्व बाबींवर तात्काळ खुलासा सादर करावा, तसेच कोसळलेले बेंच पुन्हा सुरक्षित केल्यावरच उत्खनन व वाहतुकीची परवानगी मिळेल, असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या आदेशांमुळे, संबंधित खाण कंपनीचे धाबे दणाणले आहेत,त्यांच्या अनियमित कामांसाठी मोठा खुलासा द्यावा लागणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.