नीरव मोदीच्या अटकेमुळे चौकीदाराचा प्रभाव दिसला – माधव भंडारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिमानाने आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगतात.

हजारो कोटींची कर्जे बुडवून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडनमध्ये बुधवारी झालेली अटक ही देशाचे चौकीदार किती सावध, कार्यक्षम आणि प्रभावी आहे, हे दर्शविणारी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी व्यक्त केली.

माधव भांडारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिमानाने आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगतात. त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केल्यामुळे अनेक आर्थिक गुन्हेगारांना देशाबाहेर पलायन करावे लागले. पण हे आर्थिक गुन्हेगार परदेशात आश्रयाला गेले तरी मोदी सरकारने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रभावी पावले उचलली. नीरव मोदीची अटक हे मोदी सरकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाईचे यश आहे.

त्यांनी सांगितले की, नीरव मोदी याला अटक झाल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारमधील अर्थमंत्री चिदंबरम यांच्यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. पात्रता नसताना वशिल्याने बँकांकडून हजारो कोटींची कर्जे देववणे आणि नंतर ती बुडवणे हा मोठा कर्ज घोटाळा काँग्रेस सरकारच्याच आशिर्वादाने झाला होता. नीरव मोदी यांच्या जाबजबाबात आता त्याला कोणी कशी वशिल्याने कर्जे दिली आणि त्यामध्ये त्याने कोणाला कसा लाभ करून दिला, हे स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनाच आता जाब द्यावा लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Because of nirav modi arrest we coukd see the impact of choukidar says madhav bhandri

ताज्या बातम्या