Sharad Pawar : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप नुकताच केला आहे. त्यांच्या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचं सादरीकरण केलं. दरम्यान, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे, भाजपाकडून नाही’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मात्र, आजही मला आठवतंय की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याआधी दिल्लीत मला दोन व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. त्या दोन व्यक्तींनी मला सांगितलं होतं की, महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. त्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्या लोकांनी जरी गॅरंटीचं सांगितलं तरी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. पण अशा प्रकारचे लोक भेटत असतात, त्यामुळे मी त्या दोन लोकांकडे दूर्लक्ष केलं. त्या लोकांची मी राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर त्या लोकांना जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधींना बोलले. मात्र, राहुल गांधी आणि माझं मत असं होतं की याबाबतीत आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळेल याचा आम्ही निर्णय घेतला”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे दिल्लीत पाठिमागच्या रांगेत का बसले होते?

“दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी देखील उपस्थित होतो. पहिल्यांदा हे सांगायचं आहे की मी कालपासून पाहत आहे की, दिल्लीत उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले होते? यावरून राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांनी जे प्रेजेंटेशन केलं, आता प्रेजेंटेशन पाहायचं म्हटलं की आपण पहिल्या रांगेत कधी बसत नाही. जसं आपण एखादा चित्रपट पाहायला गेलं तर पहिल्या रांगेत बसत नाहीत, आपण पाठिमागे बसतो. त्याच पद्धतीने मी स्वत: देखील शेवटी बसलो होतो. सांगण्याचं तापत्पर्य एवढंच आहे की स्क्रिनच्या जवळ आपण बसत नाहीत, अंतर सोडून बसतो. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले? याचं दुर्देवाने राजकारण करण्यात येत आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नाही’ : शरद पवार

“राहुल गांधी यांनी अतिशय कष्ट करून मतदान प्रक्रियेतील अनियमिततेबाबतची माहिती सांगितली. एका ठिकाणी एक व्यक्ती राहते. पण त्याच ठिकाणाहून ४० लोकांनी मतदान केलं आहे. अशा प्रकारचे उदाहरणे राहुल गांधींनी दिले. राहुल गांधींनी फक्त उदाहरणे दिली नाहीत तर त्या आरोपांना आधार देखील दाखवला. मात्र, राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने एक शपथपत्र द्यावं असं म्हटलं. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. राहुल गांधींनी सांगितलं की मी संसदेत शपथ घेतलेली आहे, त्यामुळे वेगळ्या शपथपत्राची गरज नाही. मात्र, तरीही निवडणूक आयोग अशा प्रकारचा आग्रह करत असेल तर हे योग्य नाही. मात्र, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांबाबत खोलवर जाण्याची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की आक्षेप निवडणूक आयोगाबाबत घेतला, मग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देण्यासाठी पुढे येण्याची गरज काय? आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.