देशाच्या राजकारणात स्वतचे वेगळे स्थान निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. विदर्भात शेतकऱ्यांसाठी आणि समाजातील दीनदुबळ्या लोकांसाठी केलेली आंदोलने आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहेत. गोपीनाथ मुंडे ज्यावेळी विदर्भात शेतकऱ्यांसाठी आंदोलन किंवा मोर्चाचे नेतृत्व करीत त्यावेळी या झंझावाताला रोखणे सत्तापक्ष आणि प्रशासनाला शक्य होत नसे इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. युतीचे सरकार असताना गृहमंत्री म्हणून त्यांनी उपराजधानीसाठी घेतलेल्या अनेक निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत मोर्चे आणि निदर्शने करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे मुंडे यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आणि त्यांच्याबद्दल आत्मीयता होती. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपचे नेते उपेंद्र कोठेकर यांनी सांगितले, गोपीनाथ मुंडे यांच्या विदर्भाच्या अनेक आठवणी आहेत.
मराठवाडय़ामध्ये त्यांचे वर्चस्व असले तरी विदर्भात त्यांनी स्वतचे स्थान निर्माण केले होते. कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मुंडे प्रथमच प्रदेशाध्यक्ष झाले होते ते नागपूर शहरात. ८५-८६ मध्ये रेशीमबागमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. मुंडे यांची त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्यांनी नागपुरातच पदभार स्वीकारला होता. त्यानंतर मुंडे यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून विदर्भात अनेक सभा आणि बैठका झाल्या असून त्यांनी केवळ महाराष्ट्रात नाही विदर्भात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.
१९९३ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप रामटेकमध्ये झाला. त्यावेळी रामटेकमध्ये त्यांची झालेली सभा चांगलीच गाजली होती.
त्यानंतर मुंडे यांनी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अकोला, भंडारा, गोंदिया या शहरात दौरे करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मेळावे आयोजित केले होते. २००९ शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर ११ डिसेंबर २०१२ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात शेतक ऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात भाजपतर्फे काढण्यात येणारा मोर्चा तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या मोर्चात राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांचे कुटुंबीय मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. गडकरी आणि मुंडे यांच्या एकत्र नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा हा बहुधा विदर्भातील शेवटचा असावा. त्यानंतर मुंडे उपराजधानीत फारसे आले नाहीत. बैठक किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत असत.
२०१२ मध्ये शेतकऱ्यांचा काढण्यात आलेल्या मोर्चा टी पॉईंटवर आला असताना मुंडे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला होता.
रेशीमबागवरून निघालेला मोर्चा निघून विधानभवनावर येऊन धडकला असताना मुंडे व्यासपीठावर न चढता शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसले होते. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या त्यांनी व्यथा जाणून घेतल्या होत्या. मुंडे यांचे संघटन कौशल्य बघता पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम केले. मुंडे नावाचा झंझावात अनेकांनी अनुभवला. आता तो शांत झाला आहे आणि तो आता कधीच परतणार नसला तरी त्यांच्या झंझावातापासून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, हे मात्र तितकेच खरे.