राज्य सरकारने घातलेल्या सुगंधी तंबाखू व सुपारीवरील बंदी त्वरित उठवावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील पानपट्टीधारकांनी १० जुलै रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी येथे झालेल्या महाराष्ट्र पान व व्यापारी महासंघ व कोल्हापूर जिल्हा पान असोसिएशनच्या मेळाव्यात घेण्यात आला. सुगंधी तंबाखू किंवा पान शरीराला अपायकारक असल्याने त्यावर र्निबध येत असतील तर दारू, सिगरेट व तत्सम पदार्थ हितकारक आहे का सरकारने हे दाखवून द्यावे, असे आव्हान या वेळी शासनाला करण्यात आले.
पानपट्टीधारकांना शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी येत्या अधिवेशनात करणार असल्याचा उल्लेख करून प्रमुख पाहुणे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, हा व्यवसाय चुकीचा असल्याचे शासनाचे म्हणणे असेल तर त्यांनी या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सत्ताधारी पक्ष हा जनतेसाठी नसून मंत्र्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी परदेशी सिगरेट, च्युइंगमची विक्री राजरोसपणे केल्याचे शासनाला चालते, पण देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेली तंबाखू विक्रीसाठी का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
अरुण सावंत म्हणाले, शासनाला पान-तंबाखू विक्रेत्यांना रोजगार द्यायला जमत नसेल, तर अस्तित्वात असलेला रोजगार काढून घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. सुगंधी पानापासून कॅन्सर कसा होत नाही, याचे स्पष्टीकरण ते करीत राहिले. या वेळी अजित सूर्यवंशी, शरद मोरे, सुधाकर बुरुड, नारायण मणकीकर, हेमांग शहा, दिनेश मानकर यासह अन्य पानपट्टीधारक उपस्थित होते.