अकोले : धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणाच्या ‘स्पीलवे’मधून १ हजार ५८ क्युसेक, तर जलविद्युत प्रकल्पांमधून ८४५ क्युसेक असा एकूण १ हजार ९०३ क्युसेक विसर्ग आज, गुरुवारी दुपारपासून सोडण्यात आला. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखी वाढ केली जाणार आहे.काही दिवसांपासून भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. आज दुपारी धरणाचा पाणीसाठा ६५ टक्के झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाच्या स्पीलवेमधून पाणी बाहेर पडल्यावर ते नदीपात्राकडे जात असताना आकर्षक धबधबा तयार होतो. हे दृश्य फक्त पावसाळ्यातच कधी तरी पाहायला मिळते. कारण धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अथवा धरण भरल्यानंतर ‘ओव्हरफ्लो’चे पाणी सोडतानाच या स्पीलवेची दारे वर उचलली जातात.

निळवंडे, मुळा धरणांच्या पाणीसाठ्यातही आज मोठी वाढ झाली. मुळा धरणात गेल्या चोवीस तासांत अर्धा टीएमसीपेक्षा जास्त पाणी आले. मुळा धरण ५३.३२ टक्के भरले. मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुळाच्या पाणलोटातील घोटी-शिळवंडी हा १४३ दलघफू क्षमतेचा लघुपाटबंधारे तलाव आज दुपारी भरून वाहू लागला.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४ हजार ५२३ दलघफू (५५ टक्के) होता. धरणातून सिंचनाचे आवर्तन सुरू असून, ९०० क्युसेक पाणी नदीपात्रात पडत आहे. प्रवरा नदीवरील भंडारदरा, कोदणी व निळवंडे या तिन्ही जलविद्युतनिर्मित केंद्रातून सध्या वीजनिर्मिती सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आढळा, भोजापूर भरले

मध्यम प्रकल्प आढळा धरण (साठवणक्षमता १ हजार ६० दलघफू, उपयुक्त साठा ९७५ दलघफू) आज भरले. त्यामुळे आढळा नदी वाहती झाली. मातीच्या या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या माध्यमातून अकोले, संगमनेर व सिन्नरमधील ३ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रास लाभ होतो. पट्टा किल्ला परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्यानंतर जेमतेम १५-१६ दिवसांतच धरण भरले. ओव्हरफ्लोच्या पाण्याने आठ बंधारे भरून घेतले जातात. ३६१ दलघफू क्षमतेचे भोजापूर धरणही भरले. परिणामी, म्हाळुंगी नदी वाहती झाली. सकाळी भोजापूरच्या सांडव्यावरून ७५ क्युसेक विसर्ग सुरू होता. म्हाळुंगी व आढळा नद्या एकत्र होत संगमनेरजवळ प्रवरा नदीला मिळतात.