मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील धरणे व तलावांचे चित्रच बदलून गेले आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहे. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठय़ाने आज पाच टीएमसीचा टप्पा ओलांडला. आढळा पाणलोट क्षेत्रातील पाडोशी (१४६ दक्षलक्ष घनफूट) व सांगवी (७२ दक्षलक्ष घनफूट हे तलाव) बुधवारी भरून वाहू लागले, त्यामुळे आता आढळा धरणाच्या पाणीसाठय़ातही वाढ होईल. दरम्यान, आज निळवंडे धरणातून १ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर मंगळवारी दुपारपासून काहीसा कमी झाला. मात्र भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ात सलग दुसऱ्या दिवशी चोवीस तासांत अर्धा टीएमसीची भर पडली. मागील ३६ तासांत भंडारदरा धरणात ७०० दक्षलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. आज सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५ हजार २५ दक्षलक्ष घनफूट झाला होता.
पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या आढळा पाणलोट क्षेत्रातही दोन दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे आज सकाळी पाडोशीचा तलाव भरून वाहू लागला. आढळाचे हे पाणी सांगवीत जमा होत असल्यामुळे दुपारी सांगवी तलावही भरून वाहू लागला. सांगवीच्या सांडव्यावरून १५० क्युसेक विसर्ग सुरू होता. यामुळे आढळा नदी वाहू लागली आहे. कृष्णवंती ही प्रवरेची उपनदी अजूनही दुथडी भरून वाहात असल्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ होत आहे. मागील ३६ तासांत धरणात २३३ दक्षलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. सायंकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा १ हजार ६३२ दक्षलक्ष घनफूट झाला होता. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे भंडारदरा ५२, रतनवाडी ८५, पांजरे ८७, घाटघर १३६, वाकी ७७, निळवंडे १३, अकोले २३, कोतूळ ८, आढळा धरण ४.