अलिबाग : माणगाव तालुक्यातील कांदळगाव येथे जखमी अवस्थेत असलेल्या दोन तरुणांसाठी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री देवदुत ठरले. मध्यरात्री 1 वाजता जखमी अवस्थेत पडून असलेल्या या दोघांना त्यांनी आपल्या शासकीय गाडीतून माणगाव येथील रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे दोघांचा जीव वाचला.दैनंदिन कामकाज आटपून गोगावले मुंबईहून महाडच्या दिशेने निघाले होते.
मध्यरात्री एक वाजता त्यांची गाडी माणगाव तालुक्यातील कांदळगाव जवळ असतांना चालकाला हेल्प हेल्प असा आवाज आला. हा आवाज ऐकताच गोगावले यांनी चालकाला गाडी थांबवण्याचे आदेश दिेले. जवळजाऊन पाहिले असता दोन तरुण जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात पडून होते. गोगावले यांनी दोन्ही जखमींना सोबत असलेल्या शासकीय वाहन घेण्याच्या सुचना केल्या. नंतर दोघांनाही माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले.
दोघांवर तातडीने उपचार करण्यात आले. एका तरुणाच्या डोक्याला जबर जखम झाल्याने सतरा टाके घालण्यात आले. दुसऱ्या तरुणाचा हात आणि पाय फ्रँक्चर झाला होता. दोघांची प्रकृती स्थिर झाल्याची खात्री केल्यानंतर गोगावले घरच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे भरत गोगावले समयसुचकतेमुळे तसेच माणुसकीमुळे दोन्ही अपघातग्रस्त तरुणांचे जीव वाचले.