Bhaskar Jadhav on Shivsena : कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मला मा‍झ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं होतं, यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नाराजी व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सरू झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी आज आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “मा‍झ्या क्षमतेप्रमाणे गेल्या ४३ वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. यात्या पुढं जाऊन मी असं म्हणालो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही, असं अनेकांच्या बाबतीत घडतं, म्हणून हे माझं दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला,” असे भास्कर जाधव म्हणाले.

पद मिळवण्यासाठी असे विधान करून राजकीय स्टंटबाजी केलं जात असल्याच्या टीकेवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “गेल्या ४३ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबानं. नाही मिळालं तर…. म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता म्हणून हे सगळं करतोय, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय.. मी कोणाकडे तरी जाणार याासाठी वातावरण तयार करतोय… मा‍झ्या आयुष्यात असली नौटंकी कधी केली नाही. माझ्या आयुष्यातील किती राजकीय वर्ष राहिली? जे मी त्या काळात केलं नाही, आता कशाला करेल? हे मी पद मिळवण्याकरिता करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.

जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन

“काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारची स्टंटबाजी केली आणि गणनेते पद पदरात पाडून घेतलं…. अरे ज्या माणसाने ४३ वर्षे अनेक पदे उपभोगली… पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा कुठल्यातरी पदाकरिता मी करणं आणि माझ्या तत्व प्रणालीला गालबोट लावणं मी कधीही केलं नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन,” असेही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

“माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत. राजकारणात ते दोष असावेत की नाही यावर चर्चा होऊ शकते. मी खोटं बोलत नाही, मला समोरचा माणूस खोटं बोलला की प्रचंड चीड येते. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द मी प्राण गेला तरी खाली पडू देत नाही. कोणाला खूष करण्यासाठी मी बोलत नाही. खरं काय ते बोलण्याचं धाडस माझ्यात आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“४३ वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकि‍र्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगलं काहीतरी घडावं यासाठी माझी तळमळ आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.