अहिल्यानगरः तरुणाचे अपहरण करून डांबून ठेवणे, त्याला मारहाण करणे, बळजबरीने कोऱ्या नोटरीवर सह्या करून घेतल्याच्या आरोपावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्षासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद देणारा तरुण हा पूर्वी संबंधित माजी महापौरांकडे चालक म्हणून कामास होता.
या गुन्ह्यासंदर्भात मच्छिंद्र झेंडे याला अटक करण्यात आल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी दिली. फिर्यादीत माजी महापौरासह एक महिला व आणखी दोघांची नावे नमूद करण्यात आली तर पाच अनोळखी व्यक्ती आहेत. ही घटना १२ ते १७ मे दरम्यान घडली.
फिर्यादित असे म्हटले आहे, की तक्रारदार हा त्याच्या दुचाकीवरून सोलापूर रस्त्यावरील वाकोडी (ता. अहिल्यानगर) गावाकडे जात असताना मुठ्ठी चौकात मोटारीतून आलेल्या तरुणांनी त्यांना अडवले. त्याचे अपहरण करत चिखली येथे नेऊन मच्छिंद्र झेंडे याच्या बंगल्यावर नेऊन त्यास मारहाण केली. त्यानंतर दौंड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन महिलेसोबत, तसेच अन्य एका मुलीसोबत छायाचित्र काढले. नगर शहरातील जुन्या न्यायालयासमोर ९ कोऱ्या नोटरींवर सह्या घेतल्या. सह्या केल्या नाहीत तर मारहाणीची धमकी दिली. अखेर १७ मे रोजी तक्रारदारास त्याच्या सासुरवाडीला सोडण्यात आले.
माजी आमदाराविरुध्द अदखलपात्र
दरम्यान आज, सोमवारी दुपारी माजी महापौर, त्याचे चुलते माजी आमदारासह तिघांविरुद्ध आणखी एक स्वतंत्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे दाखल केलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीच्या भावानेच स्वतंत्र फिर्याद दिली आहे. १४ मे रोजी माजी महापौरांच्या घरी बोलावून घेऊन आमचे नुकसान केले, त्याचे पैसे दे, नाहीतर तुझी शेतजमीन विक व माझी भरपाई करून दे, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आहे.