सोलापूर : माढा तालुक्यातील श्री संत सावता माळी महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या श्री क्षेत्र अरण गावच्या शिवारात दुसरीकडे एका वस्तीवर महाकाली मंदिराच्या नावाने अंधश्रद्धांचा बाजार मांडलेल्या एका भोंदू महाराजाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा भोंदू महाराज आपल्या आश्रमात आलेल्या भक्तांना आजार बरा करतो, निपुत्रिकांना संतान प्राप्ती करून देतो, विवाह, नोकरी लावून देतो, व्यापारात भरभराट करून देतो, महिला आकर्षण वशीकरण, संमोहन आदी थापा मारत भक्तांना लुबाडतो. त्यासाठी विविध प्रकारच्या पूजा, तंत्रविद्या, संमोहनशास्त्र पूजा आदी विद्या अवगत असल्याचे सांगून हा भोंदू महाराज अघोरी कृत्ये करायचा.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारी अर्ज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग यांना दिले होते. त्यानुसार जोग यांनी संबंधित भोंदू महाराजांच्या आश्रमात जाऊन चौकशी केली असता तेथे अघोरी पूजेसाठी लागणारे लिंबू, हळदी-कुंकू, काळी तीळ, काळे उडीद, काळ्या कापडाच्या बाहुल्या इत्यादी साहित्य सापडले. ते सर्व पोलिसांनी जप्त केले. यात संबंधित भोंदू महाराजासह आश्रमचालकांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे हे करीत आहेत.