नांदेड : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी कार्यकर्ते हरिहरराव भोसीकर यांच्या ज्येष्ठ पुत्राची अलीकडे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर दुसरे पुत्र महाराष्ट्र स्टेट को-ऑप हॉऊसिंग कॉर्पोरेशन (गृहवित्त)च्या संचालक मंडळावर जाण्याच्या तयारीत आहेत.

हरिहरराव यांचे निधन झाले तेव्हा ते उपर्युक्त दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळामध्ये कार्यरत होते, तसेच ते बँकेचे उपाध्यक्षही होते. संचालकपदाची त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विहित प्रक्रिया राबविली. त्यात शिवकुमार भोसीकर यांची उर्वरित कालावधीसाठी संचालकपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, गृहवित्त महामंडळातील भोसीकर यांचे संचालकपद रिक्त झाल्यामुळे येत्या २० ऑगस्ट रोजी हे पद भरण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा मुंबईमध्ये होणार असून तेथे भोसीकरांचे दुसरे चिरंजीव बाळासाहेब यांची निवड करण्याचे जवळपास नक्की झाले असल्याचे सांगण्यात आले.

हरिहररावांनी दीर्घकाळ वरील महामंडळावर नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांना एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. विद्यमान संचालक मंडळात त्यांचा चांगला प्रभाव होता. या पार्श्वभूमीवर तेथील प्रमुख कारभार्‍यांनी हरिहररावांच्या पुत्रास संधी देण्याचे ठरवले असून २० तारखेच्या बैठकीत औपचारिकता पूर्ण केली जाईल, असे येथे सांगण्यात आले.