आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधण्याकरता अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती. भाजपाविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं. परंतु, महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, आज (३० जानेवारी) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता महाविकास आघाडीकडून आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार, वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

“देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

“३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असं या पत्राद्वारे जाहीर करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचा अपमान? प्रवक्ते पुंडकर म्हणाले, “आम्हाला एक-दीड तास बाहेर बसवून…”

तसंच, याबाबत संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करून २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. वंचितमुळे देशातील हुकूमशाहीविरोधातील लढ्याला बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीत वंचितचा अपमान?

दरम्यान, आज ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांना एक-दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं.यामुळे वंचितचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली. त्यांतर लागलीच महाविकास आघाडीकडून वंचितला आघाडीत सामील करून घेतले असल्याचं जाहीर केलं गेलं.