रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामूळे पुन्हा भात शेती कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. सतत पडणा-या या पावसामुळे जिल्ह्यातून थंडी गायब झाली आहे. मात्र आता या थंडीची चाहूल परदेशी सीगल पक्षांनी दिली आहे. रत्नागिरी जिक्ल्ह्यातील समुद्र किनारी या पक्षांचे मोठ्या प्रमाणावर थवे दिसू लागल्याने थंडीला सुरुवात होत असल्याची वर्दी या पक्षांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, राजापूर, गुहागर रत्नागिरी येथील समुद्र किनारी या सीगल पक्षांचे वास्तव्य दिसून येवू लागले आहे. परदेशी असलेल्या या पक्षांनी थंडीची चाहूल दिल्याने आता जिल्हा वासियांना सुरु होणा-या या गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. दापोली तालुक्यातील हर्णे व कोलथरे या भागात थंडीची चाहूल देणारे विदेशी सीगल पक्षी मोठ्या संख्येने आल्याचे पहावयास मिळत आहेत.दरवर्षी हे परदेशी सीगल पक्षी सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत भारतात दाखल होत असतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास ते कोकण किनाऱ्याकडे झेप घेतात आणि थंडीच्या हंगामात स्थिरावतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदर, कोलथरे, गणपतीपुळे, आरे-वारे यांसारख्या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. समुद्रावर उडणाऱ्या या पांढऱ्या पंखांच्या झुंडी, वाऱ्याशी खेळणारी त्यांची उडाण आणि त्यांच्या किलबिलाटाने साऱ्या किनारपट्टीवर थंडीची चाहूल निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.कोकणात येणा-या पर्यटकांनाही या सीगल पक्षांच्या आगमनामुळे कुतूहल वाटत आहे. जिल्ह्याच्या विविध समुद्र किना-यांवर दिसणाऱ्या या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांसह पक्षिप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
परदेशी या सीगल पक्षांना काेकणच्या समुद्रकिनाऱ्याचे मोठे आकर्षण आहे. या पक्ष्यांच्या आगमनामागे कोकणातील उबदार हवामान आणि समृद्ध सागरी अन्नसाठा हे मुख्य कारण आहे. किनाऱ्यावर सहज मिळणारे छोटे मासे, कोळंबी आणि सागरी कीटकांवर हे पक्षी उपजीविका करतात. कोकणाचा स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण या पक्ष्यांना आकर्षित करते. फेब्रुवारीच्या अखेरीस, पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पुन्हा आपल्या मायदेशी जात असतात.
