भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना भाजपाने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य बाळगूनही भाजपाचा आक्रमक चेहरा म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांचे हे राजकीय पुनर्वसन मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोर्शी मतदार संघातून डॉ. बोंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण ते स्वस्थ बसले नाहीत. जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व आंदोलनात, कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय राहिले. विदर्भातून कुणबी, मराठा समाजात जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपामध्ये सुरू झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बोंडे यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षातून कारकीर्द सुरू केली होती. मध्यंतरी त्यांनी स्वत:चा पक्षही काढला होता. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डॉ. बोंडे यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध राहिले आहेत. भाजपच्या पक्षसंघटनात्मक बांधणीत डॉ. बोंडे यांचा उपयोग करून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. भाजपाच्या किसान मोर्चाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात त्यांना कृषीमंत्रीपद बहाल करण्यात आलं होतं. पण, तरीही त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp announces rajya sabha candidature to dr anil bonde amravati news rmm
First published on: 29-05-2022 at 20:29 IST