scorecardresearch

एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात बसणार धक्का? श्रीकांत शिंदेंची होणार उचलबांगडी? भाजपाच्या हालचाली वाढल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत.

eknath shinde and devendra fadnavis
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. असं असूनही या मतदारसंघात अनुराग ठाकूर यांची ये-जा वाढली आहे. १४ फेब्रुवारीला अनुराग ठाकूर पुन्हा एकदा कल्याण मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे का? शिवाय कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं काय होणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याची माहिती देताना भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले, “केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभेचा दुसऱ्यांदा दौरा होत आहे. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांचा एकदिवसीय दौरा आहे. मागील वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता.”

हेही वाचा- “ही ब्रेकिंग न्यूज टाका”, सुप्रीम कोर्टाआधीच सत्तासंघर्षाच्या निकालावर नारायण राणेंचं सूचक विधान

“१४ फेब्रुवारी रोजी अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत,” अशी माहिती संजय केळकर यांनी दिली.

हेही वाचा- “…तेव्हा नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी वाचवलं”, उद्धव ठाकरेंनी करून दिली वाईट काळातील आठवण

“भाजपाने महाराष्ट्रातील जे १८ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. ते मतदारसंघ अधिक सक्षम करणं आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं, हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात भाजपा मजबूत आहेच. पण लोकसभेत अधिक यश मिळावं, त्याअनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघ बळकट करण्याचं काम आम्ही करत आहोत,” अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 20:32 IST