अदानींसाठी रोहित पवार झाले ‘ड्रायव्हर’, भाजपा नेत्याने लगावला टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”

“अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात”

अदानींसाठी रोहित पवार झाले ‘ड्रायव्हर’, भाजपा नेत्याने लगावला टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”
"अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. ‘बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींचं सारथ्य केल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.

गौतम अदानी यांचं स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: बारामती विमानतळावर उपस्थित होते. गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत नेलं. यानंतर रोहित पवारांचे गाडी चालवतानाचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरले होते.

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्र – अजित पवार; बारामतीत विज्ञान, नावीन्यता केंद्राचे शरद पवार, अदानींच्या उपस्थितीत उद्घाटन

दरम्यान भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. “अदानी आणि अंबानींवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे,” असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.

“अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात. किती हा नम्रपणा,” अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे.

या कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरू विज्ञान केंद्राचे डॉ. सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ‘अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार, प्रीती अदानी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, “या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल. जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल. विज्ञान आणि नावीन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल आणि त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित होईल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp atul bhatkhalkar ncp rohit pawar gautam adani baramati sgy

Next Story
प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्र – अजित पवार; बारामतीत विज्ञान, नावीन्यता केंद्राचे शरद पवार, अदानींच्या उपस्थितीत उद्घाटन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी