राजकीय पुढाऱ्यांच्या घरी नोटांचे ढिगारे सापडणे हे आता नवीन राहिले नाही. काही दिवसांपूर्वी झारखंडमधील काँग्रेसचे नेते धीरज साहू यांच्या कार्यालयात कपाट भरून पैशांची रास आढळून आली होती. प्राप्तिकर विभाग किंवा ईडीकडून जेव्हा जेव्हा धाडी टाकल्या जातात, तेव्हा अशी रोकड सापडते. मात्र आसाममधील एका राजकीय नेत्याचा अजब फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमधील राजकारणी आपल्या बेडवर पैशांच्या नोटा पसरवून त्यावर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहेत. बेंजामिन बासुमातारी असे या राजकीय नेत्याचे नाव असून ते भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या युनायटेड पिपल्स पार्टी लिबरल (UPPL) चे नेते होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बेंजामिन बासुमातारी सध्या व्हिलेज कौन्सिल डेव्हलपमेंट कमिटी (VCDC) चे सदस्य होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बेंजामिन एका बेडवर झोपलेले दिसत आहे. त्यांच्या शरीरावर आणि आजूबाजूला ५०० रुपयांच्या नोटा पसरलेल्या दिसत आहेत. बेंजामिन यांच्या अंगावर एकही कपडा नसून त्यांच्या कमरेला फक्त एक टॉवेल गुंडाळलेला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बेंजामिन यांनी सांगितले की, सदर फोटो खूप जूना आहे. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थासाठी तो पुन्हा एकदा व्हायरल करण्यात येत आहे.
मद्यपान सोडा, तोपर्यंत केस कापणार नाही; मुलाच्या हट्टानंतर वडिलांनी स्वतःवर झाडली गोळी
युपीपीएल पक्षाने दिले उत्तर
बेंजामिन बासुमातारी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर युनायटेड पिपल्स पार्टी लिबरलचे अध्यक्ष प्रमोद बोरो यांनी एका निवेदनाच्या आधारे पक्षाची भूमिका मांडली आहे. बेंजामिन यांच्या फोटोपासून पक्षाने फारकत घेतली आहे. बेंजामिन यांना १० जानेवारी रोजीच पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, असे बोरो यांनी जाहीर केले.
“बेंजामिन बासुमातारी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “आम्ही जाहीर करू इच्छितो की, बेंजामिन यांचा युपीपीएल पक्षाशी कोणताही संबंध नाही. १० जानेवारी २०१४ रोजी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशा आशयाची एक्स पोस्ट प्रमोद बोरो यांनी केली आहे. तसेच व्हिलेज कौन्सिल डेव्हलपमेंट कमिटीवरुनही (VCDC) त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आम्ही सर्व माध्यमांना विनंती करत आहोत की, बेंजामिन आणि आमच्या पक्षाचा संबंध जोडू नये.