कराड : भाजपमध्ये गेली ३० वर्षे मी जिल्ह्यासह राज्यपातळीवर निष्ठा व प्रामाणिकपणे कार्यरत आहे. त्याचीच पोहोच पावती म्हणून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय खनिज विकास महामंडळावर (एनएमडीसी) सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला दिल्याचे ॲड. भरत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे नवनिर्वाचित सदस्य भरत पाटील यांचे कराडमध्ये आगमन झाले असता, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी, यासह युगपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, भाजप कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, प्रमोद शिंदे, नितीन वास्के, महेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माझ्या निवडीच्या पदाला राज्यमंत्री म्हणून दर्जा आहे. त्यातून भाजपमध्ये ‘देर है लेकीन अंधेर नहीं’ हा संदेश निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये गेल्याचा विश्वास ॲड. भरत पाटील यांनी या वेळी दिला. ते म्हणाले, ‘देशामधील महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व प्रकारच्या खनिजांना परवानगी देणे, तो माल बनवून विक्री व्यवस्था करणे या सगळ्यांचे काम या महामंडळाकडून पाहिले जाते. सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या महामंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची दिलेली संधी मी कधी विसरू शकत नाही, अशा शब्दांत भरत पाटील यांनी पक्षनेतृत्वाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांची आगामी निवडणूक भाजप कशी लढणार, या प्रश्नावर पाटील यांनी, महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचा भाजपचा विचार असल्याचे सांगितले. नेते सांगतील त्या आदेशाचे कार्यकर्ते पालन करतील. आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि घवघवीत यशही मिळवू, असा विश्वास भरत पाटील यांनी या वेळी दिला.