प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण; म्हणाले, “ते बोलीभाषेतलं…”

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून प्रवीण दरेकरांनी केलेल्या खळबळजनक टिपण्णीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP Chandrakant Patil Defends Praveen Darekar For His Statement On Surekha Punekar NCP gst 97
चंद्रकांत पाटील म्हणाले, "दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही." (फोटो : फाईल)

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांची पाठराखण केली आहे. “प्रवीण दरकरांच्या विधानावरून इतका गदारोळ करण्याची गरज नाही. दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही. तसं काही कारणच नाही. राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मराठीत आपण बरेच वाक्प्रचार अगदी सहजपणे उच्चारत असतो. त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर हे वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखं आहे. बोलीभाषेत अशी वाक्यं फक्त एखादा विषय समजावण्यासाठी म्हटली जातात. तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचं काही पडलेलं नाही. श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्यांची तुम्हाला अधिक काळजी आहे, असं सांगण्यासाठी प्रवीण दरेकरांनी ते विधान केलं आहे. त्यावरून एवढा गदारोळ करण्याचं कारण नाही. पण महाविकास आघाडीचे पक्ष सध्या पॅनिक झालेत. तीन-तीन पक्ष असल्याने सोशल मीडियामार्फत असा हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रवीण दरेकर किंवा आमच्या कोणाच्याही असा मनात कोणताही अश्लील अर्थ नाही”, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

दरेकरांचं विधान नेमकं काय?

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांनी नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली होती. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दरेकर बोलत होते.

राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून दिसणारं वैचारिक दारिद्र्य संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp chandrakant patil defends praveen darekar for his statement on surekha punekar ncp gst

ताज्या बातम्या