scorecardresearch

आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?, मोफत घरं देण्याच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले “प्रत्येकाची चार घरं…”

आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

BJP, Chandrakant Patil, MLA, MHADA Houses for MLA,
आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबईत स्वस्तात कायमस्वरूपी घर मिळावे अशी सर्वपक्षीय आमदारांची मागणी होती. गेल्याच आठवडय़ात आमदार निधीत एक कोटी वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर, आमदारांना आता कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा झाल्याने आमदारमंडळी खूश झाली आहेत. मात्र या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. त्यानंतर आता काही नेत्यांकडूनही निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे.

चंद्रकांत पाटलांचा आक्षेप –

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी करोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घरं दिली जाणार आहेत. कशासाठी घरं पाहिजेत?”.

मुंबईत आमदारांना कायमस्वरूपी घरे ; बीडीडी चाळीला ठाकरे, पवार, राजीव गांधी यांचे नाव

“माझं मुंबईत घर नाही. पण तरीही हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना द्या यासाठी मी आग्रही असेन. माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरं आहेत, क्षमता आहे. आमदार व्हा म्हणून कोणी नारळ, निमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही आमदार व्हा मग घर मिळेल, पाच कोटी मिळतील. त्यामुळे आमदारांचा रोष सहन करत मी हे योग्य नसल्याचं सांगत आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राम कदम यांनी उपस्थित केली शंका

आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाबाबत प्रथम प्राधान्य कोणाला? अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. शहीद विधवा पत्नीला? कोविड काळात प्राण गमावलेल्या पोलिसाला? ज्यांच्या डोक्यावर छत नाहीत अशा कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, कंपाऊंडर इतर कर्मचारी, प्राधान्य कोणाला? अशी विचारणा त्यांनी पत्रातून केली आहे.

आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयावर मनसेची आगपाखड, थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

“सभागृहात आमदारांना मोफत घरे देणार असा निर्णय जाहीर केलात. निर्णयाला विरोध असण्याचा कारण नाही. मात्र या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडणाऱ्या शहीद सैनिकांच्या लहान कच्चाबच्चांना, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना, त्यांच्या निराधार विधवा पत्नीला, ज्याच्या डोक्यावर छत नाही अशा कुटुंबांना अगोदर मोफत घरे देणार? की सरकार म्हणून आधी स्वत:चच भल म्हणत आमदारांना देणार?,” अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.

शहीद विधवा पत्नी आणि आमदार यापैकी पहिले मोफत घर कोणाला याचे उत्तर महाराष्ट्राला विचाराल, तर हा शिवरायांचा महाराष्ट्र शहीद सैनिकाची पहिली निवड करेल, कोविड काळात सेवा करताना ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या डोक्यावर छत नाही त्याच्याच कुटंबाला पहिले प्राधान्य देईल असंही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्टीकरण –

“आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

दरम्यान शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार घरासाठी पैसे देत असतील तर त्यात काही अयोग्य नसल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp chandrakant patil free mhada houses for mla maharashtra government sgy

ताज्या बातम्या