कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस – भाजपामध्ये खडाखडीला सुरुवात झाली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारसंघात आपला उमेदवार असल्याने काँग्रेसने उमेदवारीचा दावा केला होता. या मतदारसंघात सातत्याने शिवसेनेचा आमदार निवडून येत असल्याने उमेदवारी मिळावी, असा सेनेचा दावा होता. अखेर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत होऊन जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

“जयश्रीताई निष्ठा महत्वाच्या असतात. मी तुमच्या घरी दोनवेळा आलो, हात जोडून तुम्हाला अचडणी असतील तर त्यावर मात करु यासाठी विनंती केली. तुम्ही कालपर्यंत भाजपाच्या नगरसेविका होत्या. कालपर्यंत तुमचा धीर नगरसेवक होता. चंद्रकांत जाधव हे भाजपाचे, संघाचे अतिशय चांगले कार्यकर्ते होते. अपघाताने तुमचे पती हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले. पुन्हा एकदा परत येण्याची ही एक संधी होती. त्यामुळे त्यांनी मन मोठं करत दूरचं पहायला हवं होतं. शेवटी या देशाला भवितव्य मोदी आहे. तुम्ही ज्या पक्षाला धरुन बसला आहात त्या पक्षाचे नेते कुठे आहेत शोधायला लागतं,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणूक ; काँग्रेस – भाजपमध्ये चुरशीची लढत

“कोल्हापुरची जागा सात पैकी पाच वेळी शिवसेना आणि दोन वेळा काँग्रेस जिंकली. त्यातून ही जागा त्यांनी काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचा कार्यकर्ते हतबल, नाराज, अस्वस्थ आहेत. रोज सकाळी उठून नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढावे लागत असल्याने, अजानची स्पर्धा घ्यावी लागते यामुळे अस्वस्थ आहे. या निवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवं ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे,” असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

“त्यामुळे सावध राहा. उद्या संजय राऊत आम्ही आमच्या घरचं पाहून घेऊ म्हणतील. तुमच्या घरी काय सुरु आहे हे रोज टीव्ही सुरु केल्यावर दिसतंय,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाराज शिवसैनिक संपर्कात आहेत का असं विचारलं असता त्यांनी हे सांगण्याइतका कच्चा राजकारणी मी नाही असं ते म्हणाले.

चंद्रकांत जाधव व त्यांच्या पत्नी जयश्री या मूळच्या भाजपच्या. गेल्या वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला होता. त्यातूनच चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपची उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला होता. पण जाधव यांनी हातमिळवणी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मन मोठे करायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत सत्यजीत कदम यांनी काँग्रेसकडून लढवून लक्षणीय मते मिळवली होती. अलीकडे त्यांनी भाजपमध्ये केवळ प्रवेश केला नाही तर पक्षाची उमेदवारीही मिळवली आहे. जाधव – कदम या दोन्ही तालेवार घराण्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता इकडचे उमेदवार तिकडे आणि तिकडचे इकडे अशी अदलाबदल झाली आहे. दोघा माजी नगरसेवकातून आमदार होण्याची पहिली संधी कोणाला? शहराची पहिली महिला आमदार होणार का? याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil on congress satej patil kolhapur by election sgy
First published on: 23-03-2022 at 12:53 IST