राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार? असंही ते म्हणाले आहेत. तसंच जे रस्त्यात येतील ते संपतील असा इशारा दिला आहे. मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील एबीपी माझाशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“परमपूज्यनीय मोहन भागवत यांच्या म्हणण्यावर मी काही म्हणणं योग्य नाही. पण ताकद इतकी वाढवावी लागते की ती परत वापरावीच लागत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. हिंदुत्व हा शब्द तुम्ही पूजा पद्धतीशी जोडू नका, संघाला पूजा पद्धतीशी संबंधित अभिप्रेत नाही. हिंदूंमध्ये कोणी गणपतीला मानतं, कोणी देवीला मानतं तर कोणी कोणाला मानतच नाही. पण इतरांना मोठं करण्यात आनंद मानणं, दुसऱ्याचं न ओरबडणं व्यवहार असतो. हा जो हिंदू शब्द आहे तो आचाराशी, व्यवहाराशी जोडलेला आहे,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

“पुढील १५ वर्षात अखंड भारत पहायला मिळेल”, मोहन भागवत यांचं विधान; म्हणाले “जग फक्त शक्तीला मानत असेल तर…”

“हिंदू राष्ट्राचा विचार केला तर जिथे हिंदू संस्कृती होती, आजही मंदिरं आहेत, हिंदू विचाराने जीवनपद्धती आहेत असं खूप लांबपर्यंत जावं लागेल. आता त्या सगळ्यांना भारताच्या राजकीय नेतृत्वाखाली आणण्याची संघाची कल्पना नाही. संघाची भूमिका मोहन भागवतांनीच मांडली पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“मोहन भागवत यांच्या कल्पनेत, विचारात, मांडणीत अशा प्रकारे सगळ्या जगाचं एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू असं नाही,” असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. “हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे. हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही, हिंदू या शब्दातच सर्व धर्मांना समान भाव मिळणं आहे. पण म्हणजे आपल्या धर्माबद्दलही अभिमान बाळगला पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोहन भागवतांच्या ‘अखंड भारत’ विधानाला संजय राऊतांचा पाठिंबा; म्हणाले “१५ वर्ष नाही, १५ दिवसात…”

“राज ठाकरेंनी मी धर्मवेडा नाही तर धर्माभिमानी असल्याचं चांगलं वाक्य म्हटलं आहे. त्या धर्माभिमानी असण्यावरच आक्षेप आहे जो आम्हाला मान्य नाही,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

मोहन भागवतांनी हातात दंडुके घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर विचारलं असता ते म्हणाले की, “मोहन भागवतांच्या वक्तव्यात कुठेही हिंसाचार नाही. पण हिंदू आता मार खाणार नाही, सहन करणार नाही. मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हे तर कोणीही म्हणेल. हिंदू हा एक विचार आहे, जीवन जगण्याचा व्यवहार आहे. त्याअर्थी सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून त्यांना हिंदू अपेक्षित आहेत. त्याला आडवे येणारे या अर्थाने त्यांनी म्हटलं आहे”.

संघाला आपली ताकद वापरावीच लागत नाही. संघ ताकदच अशी निर्माण करतो जी वापरावली लागत नाही असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil on rss chief mohan bhagwat akhand bharat statement sgy
First published on: 14-04-2022 at 14:00 IST