गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हनुमान चालीसावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याला कारणीभूत ठरली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका. राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं. यानंतर खुद्द मनसेमधूनच पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतल्यानंतर देखील मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरकसपणे या भूमिकेचं समर्थन केलं आहे. यासंदर्भात आज कोल्हापुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसेनं आज रामनवमीच्या निमित्ताने थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवत शिवसेनेला डिवचलं. या प्रकारानंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. “हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलेल्या शिवसेनेला संदेश देण्याचा प्रयत्न” असल्याची प्रतिक्रिया किल्लेदार यांनी दिली. तसेच, “शिवसेना हिंदुत्व विसरली आहे”, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी देखील तोफ डागली. यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं.

“भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर…”

“हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसानेही राग यायला नको”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“संपलेल्या पक्षांवर मी…”, आदित्य ठाकरेंचं मनसेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर!

“शिवसेना छद्मधर्मनिरपेक्षवादी झाली आहे”

दरम्यान, शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याच्या मुद्द्यावरून देखील देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. “ज्या वेळी शिवसेनेनच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव छापलं, त्यावेळी हिंदूत्ववादी असलेली शिवसेना ही छद्मधर्मनिरपेक्षवादी झाली. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण लांगुलचालनाला आमचा विरोध आहे. शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील, तर हे प्रश्न निर्माण होणारच”, असं फडणवीस म्हणाले.

पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनाचा निषेध

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुंबईतील सिल्व्हर ओकवर झालेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाबाबतच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “आम्ही आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो. सातत्याने त्यांची मागणी लावून धरली होती. पण सरकारने आडमुठी भूमिका घेतली. ५ महिने हा संप चिघळवत ठेवला. कर्मचाऱ्यांचा हा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय. पण शरद पवारांच्या घरी घडलेली घटना चुकीची होती. तिचा आम्ही निषेधच करतो”, असं ते म्हणाले.

मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण; यशवंत किल्लेदारांसोबत कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

तसेच, “माझा सवाल हाच आहे की पत्रकारांना लोकं जाणार असल्याचं माहिती आहे, तासभर आधी पत्रकारांना मेसेज देत आहेत, सगळा मीडिया उपस्थित राहिलाय आणि पोलीस झोपलेत?” असं देखील फडणवीस म्हणाले.