अहिल्यानगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विजयादशमीला होणाऱ्या संघाच्या संचलनात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यंदाच्या शताब्दी संचलनात नगर जिल्ह्यातून किमान २५ हजार भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, त्यासाठी २२ सप्टोंबरपर्यंत गणवेश शिवून घ्यावेत, गणवेशासाठी संघाच्या नगरमधील कार्यालयात संपर्क करा, अशी स्पष्ट सूचना भाजप कार्यकर्त्यांना आज, मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत प्रदेश संघटनमंत्री विजय चौधरी व प्रदेश मुख्यालयातील प्रमुख रवि अनासपुरे यांनी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा नगर शहरात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वरील सूचना करण्यात आल्या. रा. स्व. संघाच्या यंदाच्या विजयादशमीच्या संचलनात भाजपचे मंत्री, आमदार, संघाच्या गणवेशात सहभागी होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे संघाच्या संचालनात सहभागी होण्याची जाहीर सूचना भाजपच्या कार्यक्रमात प्रथमच दिल्याची चर्चा कार्यकर्ते करत होते. संघाच्या संचलनाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढा, कमानी उभारा, असेही आवाहन चौधरी यांनी केले आहे. गणवेशासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला.

याशिवाय पुढील आठवड्यात प्रत्येकी ४-५ गावे मिळून किमान १ हजार जणांच्या उपस्थितीत हिंदू संमेलने आयोजित करण्याची सूचनाही भाजपच्या मंडलाध्यक्षांना करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यानेच महाराष्ट्रात चमत्कार घडवला. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा, भाजप व संघाची विचारधारा एकच आहे, असेही चौधरी व अनासपुरे यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा नगर शहरात आयोजित करण्यात आली होती. पक्षाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला आहे. त्याचा निवडणुकाीसाठी उपयोग होईल, असेही अनासपुरे यांनी सांगितले. भाजपने सेवा पंधरवड्यासाठी नगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेले आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव, जळगाव), माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (महानगर), दिलीप भालसिंग (दक्षिण) व नितीन दिनकर (उत्तर) आदींसह उपस्थित होते.

पक्षाच्या बूथचे तीन गटांत वर्गीकरण

‘स्थानिक’च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बूथप्रमुखांना, बूथ सशक्तीकरण अभियान ‘सरल ॲप फॉर्म’ कार्यशाळेत वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये बूथचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे बूथ भाजप जिंकू शकते ते – ‘अ’, जे भाजप जिंकू शकेल परंतु प्रयत्नांची आवश्यकता आहे ते ‘ब’, तर जे बूथ भाजपला जिंकणे कठीण होईल अशांची ‘क’ अशी वर्गवारी करून माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.

खराब कामगिरीची कारणे शोधा

भाजपच्या खराब कामगिरीची कारणे शोधण्यासाठीही वितरित अर्जांमध्ये पर्याय देण्यात आले आहेत. त्यानुसार बूथप्रमुखांनी भाजप नेत्यांमध्ये गटबाजी आहे, विरोधी पक्षाच्या बलवानांच्या प्रभावाखाली मतदान झाले, भाजप नेत्यांकडून प्रचाराचा अभाव, विरोधी पक्ष किंवा उमेदवाराकडून दारू व पैशाचे वाटप, प्रतिकूल जातीय समीकरण, भाजप उमेदवारांची अलोकप्रियता, विरोधी पक्षाची लोकप्रियता, दुसऱ्या पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून मतदान, बाह्य उमेदवार ज्यामुळे समर्थनाची कमतरता निर्माण झाली, याचीही माहिती संकलित करून अर्जात भरण्यास सांगण्यात आले आहे.

भाजपने काय करावे हे त्यांचे धोरण आहे. परंतु जे स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मानतात त्यांनी पूर्ण गणवेशात विजयादशमीच्या उत्सवास उपस्थित राहावे, असे संघाचे धोरण आहे. हिराकांत रामदासी, जिल्हा कार्यवाह, रा. स्व. संघ, अहिल्यानगर.