सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले असून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी आदी भागांत भाजपाचा प्रभाव कायम असताना सांगोला तालुक्यात एकनाथ शिंदेचलित शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांनी प्रथमच वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे आणि त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांच्या गटांनी संमिश्र बहुमत मिळविले आहे. माळशिरसमध्ये भाजपाचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील गटाने दहापैकी आठ ग्रामपंचायतींवरील वर्चस्व राखले आहे. माढ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे गटाने ताकद कायम राखताना टेंभुर्णीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन मोहिते-पाटील गटाचे, भाजपाचे योगेश बोबडे यांनी प्रस्थापितांना हादरा देत सत्ता खेचून आणली आहे.

हेही वाचा – “आता आपण आवाज उठवायला पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जरांगे-पाटील म्हणाले…

अक्कलकोटमध्ये १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाच्या बाजूने बहुसंख्य ग्रामपंचायतींमधून कौल मिळाला आहे. मात्र याच तालुक्यातील केगाव बुद्रुकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने श्रीशैल आहेरवाडी यांच्या माध्यमातून सत्ता संपादन केली आहे. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे गटाची ताकद आणखी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपाचे आमदार सुभाष देशमुख गटाने वर्चस्व राखताना विरोधकांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. सर्वांचे लक्ष वेधलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीत भाजपाचे यशपाल वाडकर गटाने २५ वर्षांची परंपरा खंडित करून सत्ता मिळविली आहे. उळे येथेही भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे. दोड्डी येथे मात्र काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. तर वळसंग ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन तेथे जगदीश आंटद यांच्या गटाला बहुमत मिळाले आहे.

हेही वाचा – “इतक्या नोंदी सापडत आहेत की…”, न्या. शिंदे समितीच्या बैठकीनंतर जरांगेंच्या शिष्टमंडळाची प्रतिक्रिया

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल ‘ या संवादामुळे आजही प्रसिद्धीच्या वलयात असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात स्वतःच्या चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश मिळविले तरी इतर तीन ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या आहेत. त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांना शेकापने हादरा दिल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यातील वाढेगाव ग्रामपंचायतीवर शेकापने झेंडा फडकावला आहे. सावे ग्रामपंचायतही शेकापने राखली आहे. माळशिरस तालुक्यात वाफेगाव, लवंग, माळीनगर, कोंढारपट्टा, सवतगव, दहिगाव, धर्मपुरी आदी आठ ग्रामपंचायती मोहिते-पाटील गटाने राखल्या आहेत.

मोहोळ तालुक्यात जामगाव येथे भाजपाचे विजय डोंगरे यांच्या गटाने सत्ता संपादन केली आहे. पंढरपूर तालुक्यातील पुळूजची ग्रामपंचायत भीमा साखर कारखान्याचे अध्वर्यू, खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक गटाने राखली आहे.