मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलीकडेच काही दिवसांसाठी आपल्या मूळ गावी गेले होते. अशापद्धतीने अचानक गावी गेल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावी गेले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीकास्र सोडलं.

भारतीय जनता पार्टीने अजित पवार गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानसिक आजार देण्याचं काम केलं आहे, अशी टीका विनायक राऊतांनी केली. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवारांकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आशेनं आणि आदराने पाहत आहे. त्यांनी जनमताचा आदर करावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आजार आहे की शारीरिक आजार आहे? असा प्रश्न विचारला असता विनायक राऊत म्हणाले, “मी त्याच्या फार खोलात गेलो नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानसिक आजार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने अजित पवारांच्या माध्यमातून केलं आहे.”

हेही वाचा- “शिंदे गटाच्या बोकांडी…”, खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “रायगडच्या आमदाराची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गटाचे आमदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, या चर्चेवरही विनायक राऊतांनी भाष्य केलं. “शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची उरली सुरली आशा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती, पण ती आता मावळली आहे. शिंदे गटाच्या बोकांडी अजित पवार गटाचा भस्मासूर बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील लोकांना आता भविष्य राहिलेलं नाही. त्यांच्यासमोर मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. ही त्या सर्वांची एकप्रकारची राजकीय आत्महत्याच आहे”, असंही खासदार राऊत म्हणाले.