राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. सुप्रिया सुळेंनी इंदापुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून भाजपाकडून टीकेचा सूर लावला जात आहे. त्यात आता आमदार गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही, अशा आशयाचं विधान गोपीचंद पडळकरांनी केलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“..तो काळ आता गेला, आता कर्तृत्व दाखवावं लागेल”, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचा टोला!

यावर प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि सुप्रिया सुळेंवर तोंडसुख घेतलं आहे. “सुप्रियाताईंनी खरंतर राज्यातल्या लोकांना एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्यामागून देशात अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वत:च्या भरंवशावर ३-४ वेळा मुख्यमंत्री झाल्या. मायावती ४ वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादी पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं. जगनमोहनसारखा तरुण मुलगा, ज्याच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं अशा नवख्या मुलानं एकहाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ता आणली. सुप्रिया सुळेंना हे विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली ४०-५० वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात, पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत”, असं पडळकर म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमचे कितीही दौरे झाले, तरी…”

“राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर, विश्वासघात न करता, पाठीत खंजीर न खुपसता एकदाही राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवता आलेलं नाही. त्यांनी दौरे करत बसावं, राज्यातल्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुरतं ओळखलं आहे. तुमचे कितीही दौरे झाले, तरी आता काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नको, असं म्हणणाऱ्या युवकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. यांच्या भ्रष्टाचाराला, जातीयवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातकीपणाला राज्यातल्या लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील”, असं ते म्हणाले.