उत्तर प्रदेशसोबत इतर तीन राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचं म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. गुरुवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा देण्यात आल्या. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली. विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात”, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य

शरद पवारांना फडणवीसांचं यश अद्याप मान्य झालं नाही असं विचारण्यात असता गोपीचंद पडळकर म्हणाले की, “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”.

शरद पवार निकालावर काय म्हणाले ?

देशात भाजपाला प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते, असं मत शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर व्यक्त केलं होतं. तसंच पंजाबमधील निकाल काँग्रेसला धक्का देणारा आहे, असंही त्यांनी म्हटलं.

‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. दिल्लीत या पक्षाने ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केलं आहे. दिल्लीच्या कामाचा फायदा पंजाबमध्ये ‘आप’ला झाला. त्यामुळे पंजाब सोडलं तर लोकांनी सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज देशात प्रभावी राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्चपासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. त्यानंतर पुढची नीती ठरवण्यासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.