विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. राजकीय वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषांबद्दल, महिलांबाबत कधीही चुकीचं बोललेलो नाही. मात्र या अगोदर जो महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी राज्यपालांनी अक्षरशा राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला होता. वेगळ्याप्रकारची वाक्यरचना केली होती, बेताल वक्तव्य केलं होतं. जो शब्दप्रयोग करायला नको होता, तो त्यांनी केला होता. ते सर्व मी त्यावेळी समोर मांडलं होतं. मला एक कळत नाही, आता हे मागील दोन दिवस भाजपा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले, की तुम्ही अजित पवारांच्याविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपाने विरोधीपक्षनेते पद दिलेलं नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे ५३ आमदार आहेत, त्यांनी ते विरोधीपक्षनेते पद मला दिलेलं आहे. त्यामुळे त्या पदावर मला ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा काहीच अधिकार नाही.”

हेही वाचा – “आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात…” शिंदे-फडणवीसांना उद्देशून संजय राऊतांचं विधान!

याशिवाय, “मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की मंत्री, आमदार, खासदारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की, हे आम्हाला आंदोलन करायला सांगत आहेत आणि अजित पवार चुकीचं बोललं असं सांगत आहेत. मात्र आम्हालाही कळेना तुम्ही नेमकं काय चुकीचं बोलले आहात. परंतु आम्हाला आंदोलनचा काय पॅटर्न असला पाहिजे, अजित पवारांच्या फोटोला फुली आणि उर्वरीत मायना असं सगळं पाठवून दिलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे की, जिथे तुम्ही आंदोलन कराल त्याचा फोटो काढायचा आणि तो भाजपा कार्यालयास पाठवायचा. अशा पद्धतीने ते आंदोलन करायचं असं सांगितलं गेलं.” असं म्हणत अजित पवार यांनी भाजपाच्या आंदोलनावर टीका केली.

याचबरोबर, “आंदोलन करणाऱ्यांच्याही मनात किंवा ज्यांनी सांगितलं त्यांना मला विचारायचं, की महापुरुषांचा अपमान हा बेताल वक्तव्य करून, नको तो शब्दप्रयोग वापरून हा राज्यपालांनी केला आहे. मंत्र्यांनी केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांचं विधानही आपल्या समोर आलेलं आहे. याशिवाय सत्तारुढ पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराजांची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली होती. प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात हा जावाई शोध लावला होता. गोपीचंद पडळकरांनीही वादग्रस्त विधान केलं होतं. अशा पद्धतीचे वक्तव्यं त्यांचे मंत्री, आमदार, राज्यपाल करत आहेत आणि त्याबद्दल हे काहीच बोलालयला तयार नाहीत. त्याबाबत त्यांच्यापैकी कोणीच माफी मागायला तयार नाही. या गोष्टीची नोंद राज्याने व आपण सगळ्यांनी घ्यावी.” अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी भूमिका मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp has not given me the post of leader of opposition ajit pawar msr
First published on: 04-01-2023 at 14:43 IST