गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावणार होत्या. परंतु राज्य सरकारनं चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. मुंबई मिररनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. तसंच कोकणी माणसावर कोणता आणि कसला राग काढला ? असा सवालही त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कोणता आणि कसला हा राग काढला?,” असं सवाल शेलार यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर टीका केली.

काय आहे प्रकरण ?

११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवसाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या निर्णयानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं विशेष तयारीही केली होती. वेळापत्रकाप्रमाणे रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांपासून सावंतवाडीपर्यंत रेल्वे सेवेचं नियोजन केलं होतं. तसंच हे वेळापत्रक शुक्रवारी रेल्वे बोर्डालाही पाठवण्यात आलं होतं. “गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या १९० विशेष रेल्वेगाड्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु राज्य सरकारनं हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. सोमवारी आम्हाला याबाबत तोंडी माहिती देण्यात आली. परंतु आम्ही लिखित स्वरूपात तो देण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितली.

“कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत,” अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar criticize slams cm uddhav thackeray government konkan ganpati spacial railway trains jud
First published on: 11-08-2020 at 20:23 IST