प्राप्तिकर विभागानं आपल्याला नोटीस बजावली असून राजकीय विरोधकांना प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटिसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळला असून नोटीस देण्याचा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता असं सांगितलं आहे. दरम्यान, “सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस,” असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

“कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आलं आहे. सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस,” असं म्हणत भातखळकर यांनी पवारांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांवर टीका केली आहे.

आणखी वाचा- निवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की…

काय म्हटलं निवडणूक आयोगानं?

“भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस बजावण्यासाटी कोणताही आदेश दिला नव्हता,” असं निवडणूक आयोगाने निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं.

आणखी वाचा- शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस, निवडणूक पत्राबाबत मागितलं स्पष्टीकरण

काय म्हणाले होते पवार?

२००९, २०१४ आणि २०२० मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून प्राप्तिकर विभागाने आपल्याला नोटीस बजाविली असून, त्याला लवकरच उत्तर देऊ, अशी माहिती शरद पवार यांनी मंगळवारी दिली. ‘संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत पवारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला टोला हाणला.

“आपल्याला सोमवारीच नोटीस प्राप्त झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस बजाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधकांना प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटीस बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा,” आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

“निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून ही नोटीस बजाविण्यात आली. उत्तर देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारला जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यामुळेच आपण लगेचच या नोटिसीला उत्तर देऊ,” असं शरद पवार यांनी सांगितलं.