जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच त्यावेळी आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून मागील वर्षभर तिला ब्लॅकमेल केले. इतकंच नाही तर आता हे व्हिडीओ थेट तिच्या पतीलाही पाठवण्यात आल्या. यानंतर पीडितेच्या पतीचा व्हिडीओ पाहून या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातील माय-माऊलींनी घाबरून न जाता पुढे येऊन याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलं. तसेच सरकार तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रा वाघ म्हणाल्या, “जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली. वर्षभरापूर्वी एका महिलेला चहामध्ये गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यावेळी काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. यानंतर गेले वर्षभर या महिलेला विविध प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले.”

“धक्क्याने बलात्कार पीडितेच्या पतीचा मृत्यू”

“आता तर कहर इतका झाला की, हे व्हिडीओ आणि इतर संभाषणाच्या क्लिप्स पीडित महिलेच्या पतीला पाठवण्यात आले. त्या धक्क्याने पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला,” अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

व्हिडीओ पाहा :

“…तर आजचा अनर्थ कदाचित टळला असता”

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “झालेली घटना वाईटच आहेत. मात्र, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वर्षभरापूर्वी त्या महिलेसोबत ही घटना घडली तेव्हाच तत्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करून गुन्हा नोंदवला असता तर आजचा अनर्थ कदाचित टळला असता.”

“अन्याय, अत्याचार झाला तर सहन करू नका”

“मला महाराष्ट्रातील सर्व मैत्रिणींना, माय-माऊलींना, भगिणींना सांगायचं आहे की, अन्याय, अत्याचार झाला तर सहन करू नका. पुढे या आणि पोलिसांकडे तक्रार करा. सरकार तुमच्यासोबत आहे, पोलीस तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे कसलीही भीती न बाळगता पुढे येऊन गुन्हा नोंद करा,” असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं.

हेही वाचा : “हिंमत होतेच कशी?”, चित्रा वाघ राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर बरसल्या; म्हणाल्या, “कोणीतरी लिहून दिलं आहे आणि…”

“आपणही तितकंच सतर्क राहिलं पाहिजे”

“जालन्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत. त्या प्रकरणात पुढे कार्यवाही होत आहे, तपास सुरू आहे. येणाऱ्या काळात यातील इतर अपडेट्स येतील. परंतु या घटना होऊ नये म्हणून आपणही तितकंच सतर्क राहिलं पाहिजे,” असंही चित्रा वाघ यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh comment on gang rape case in jalna video recording blackmailing rno news pbs
First published on: 22-11-2022 at 16:41 IST