Girish Mahajan : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील पक्षात रस्सीखेच सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे हे इच्छुक आहेत. मात्र, नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपाचे गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं, तर रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र, शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित केला. त्यामुळे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे. यावर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. “आता दीड दोन वर्षांनी कुंभमेळा आहे. त्यामुळे मी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आग्रह धरला होता”, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले, “नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाची मागणी आहे. तीनही पक्षाचे नेते नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. आधी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी माझ्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. महायुतीमधील तिन्ही नेते यासंदर्भात चर्चा करत आहेत. त्यामुळे हा तिढा लवकरच सुटेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

“महायुतीमधील तीनही पक्ष तोला मोलाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण पालकमंत्री व्हावं, आता गेल्यावेळी २०१४ ते २०१९ दरम्यान कुंभमेळा होता. त्यावेळी मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री होतो. त्यानंतर पुन्हा सरकार आल्यानंतर दादा भुसे यांना पालकमंत्री केलं होतं. तेव्हाही पालकमंत्री पदाचा विषय लांबलेला होता. मात्र, तेव्हा मी म्हटलं होतं की दादा भुसेंना पालकमंत्री करा. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मीच सांगितलं होतं आणि दादा भुसे यांना पालकमंत्री केलं होतं”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता पुन्हा एकदा कुंभमेळा आलेला आहे. दीड दोन वर्षांनी कुंभमेळा आहे. त्यामुळे मी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आग्रह धरला होता. तसेच कुंभमेळ्यात मंत्री राहिलो आहे आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणाले सगळं सुरळीत करायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा. कुंभमेळ्याचं मोठं चॅलेंज असतं. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भावीक यावेळी येतील. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता. या वेळेला तशीच परिस्थिती राहिली तर आमचं काम अधिक सोयीचं होईल म्हणून आम्ही नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी केली होती आणि तशा प्रकारे निर्णय जाहीर झाला होता. मात्र, नंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. मला वाटतं दोन ते तीन दिवसांत हा तिढा सुटेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.