“गेल्या ५० वर्षांपासून नेतृत्व करत असलेले शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘गेल्या पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे टीव्हीवर, ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सतत सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, शरद पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. रोहित पवार तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल,” अशी टीकाही पडळकर यांनी केली.

आणखी वाचा- फडणवीसजी, आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात, कारण… : रोहित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्हाला साधा गावातील रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते आहेत, त्यावरून प्रचंड रहदारी आहे आणि लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचही आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. येत्या काही दिवसात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात-लवकर दुरुस्त करावे आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो,’ असंही ते म्हणाले.