वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याची घोषणा झाल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडत आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील लाखभर रोजगार गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे सातत्याने करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज वडगाव-मावळ परिसरात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्च्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. जनआक्रोश मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंची अवस्था ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी झाल्याची टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आधीच दिला होता सल्ला पण…”, मनसे नेत्याचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशी अवस्था आदित्य ठाकरेंची झाली आहे. विश्वासघाताने त्यांच्याकडे सत्ता आली होती. अडीच वर्षे या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या घरात होतं आणि ते स्वत:ही कॅबिनेट मंत्री होते. पण जेव्हा महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या आधाराची गरज होती, लोकांना ऑक्सीजन बेड मिळाले नाहीत, अनेक लोकांचा उपचाराविना मृत्यू झाला, अशा वेळी यांनी लोकांना आधार देणं, आवश्यक होतं. पण त्यावेळी आदित्य ठाकरे घराबाहेर पडले नाहीत. आता सगळं त्यांच्या हातून गेलं असताना ते लोकांमध्ये जात आहेत. याचा त्यांना काही उपयोग होईल, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.