नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पटोले यांनी आधी काँग्रेस वाचवावी त्यानंतर इतर गप्पा माराव्या, असे ते म्हणाले. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत नाना पटोले यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी स्पष्ट दाखवून दिली आहे. नाना पटोले यांनी आता तरी डोळे उघडावे. आधी काँग्रेस वाचवावी त्यानंतर इतर गप्पा माराव्या. असे ते म्हणाले.
नाना पटोलेंकडून स्पष्टीकरण
दरम्यान, याबाबत आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा राजीनामा आला नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत. याबाबत आम्ही १५ फेब्रुवारीरोजी कार्यकारणी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पक्षातील घडामोडींवर चर्चा केली जाईल, असं ते म्हणाले.