राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे राज्य सरकारपासून ते रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांपर्यंत हा मुद्दा तापला आहे. राज्य सरकारकडून वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र, वंशावळ शब्द काढण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे. संवैधानिकदृष्ट्या असं आरक्षण देणं अशक्य असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडेंनी त्यांच्या परिक्रमा पूर्तीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “ही परिक्रमाच होती. श्रावणात दुर्गापरिक्रमा करावी असं म्हणतात. खूप वर्षं ऐकत होते. यावेळी ठरवूनच टाकलं की करुयात. प्रचंड चांगला प्रतिसाद होता”, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनाविषयी विचारणा केली असता त्यावर पंकजा मुंडेंनी भूमिका मांडली. “मराठा आरक्षणाचा विषय सध्या सगळीकडे चर्चेत आहे”, असं त्या म्हणाल्या.

“अशी कोणती मागणी नव्हतीच”

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी कोणती मागणीच नव्हती, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “मुळात मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी काही मागणी नव्हती. त्यांची साधी मागणी होती की त्यांना आरक्षण मिळावं. त्यांच्यातला जो समाज वंचित राहिला आहे, त्यांना आरक्षण देण्याला सगळ्यांची मान्यता होती. गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या नेत्यांची त्याला मान्यता होती”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली; म्हणाले, “अध्यादेशात…!”

“आमची भूमिकाही पहिल्यापासून स्पष्ट आहे. आमचं मराठा आरक्षणाला समर्थन आहे. पण असं कोण म्हणालं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या? असं शक्य नसतं. संविधानाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरं खरं आरक्षण दिलं गेलं पाहिजे”, असं पंकजा मुंडेंनी यावेळी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आत्महत्येचं पाऊल उचलू नका”

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचं चुकीचं पाऊल उचलणाऱ्या तरुणांना पोटतिडकीनं आवाहन केलं. “हा सगळा प्रकार अत्यंत दु:खदायक आहे. मी हात जोडून मराठा समाजाच्या सर्व युवकांना विनंती करते की तुम्ही तुमची मागणी करा. संविधानिक अधिकाराप्रमाणे मागणी करा. पण स्वत:चा जीव देण्यासारखा प्रकार करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सर्व मावळे आहोत. त्यांच्या विचारांनी लढण्याची भूमिका आपण ठेवायला हवी”, असं त्या म्हणाल्या.