बीड : काही जण म्हणतायत, आम्हाला नगर पालिका निवडणुकीत उमेदवार मिळणार नाहीत. हे खरे आहे. कारण दहशत आणि माफियाराज बोकाळले आहे. रामायणात रावणाला सुद्धा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. पण श्रीरामाच्या वानरसेनेने त्याला पराभूत केले. माझे कार्यकर्ते स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत. मी दिलेला उमेदवार द्वारपाल बनून जनतेची कामे करील. मत खरेदी करून त्याला देशोधडीला लावणार नाही. फाटका उमेदवारही तुमच्या बलाढय़ उमेदवाराला लोळवेल, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळून धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. परळीची जनता खूप हुशार आहे. कोणाला किती उडू द्यायचे आणि कोणाचा पतंग कधी कापायचा हे त्यांना चांगले माहीत असल्याची पुष्टी जोडून पंकजा मुंडे यांनी पालिका निवडणुकीचे रणिशगच फुंकले.

परळी येथे रविवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दिवाळी स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी आमदार नमिता अक्षय मुंदडा, माजी आमदार आर.टी.देशमुख, फुलचंद कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, परळी मतदार संघाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व देशाला दिले. त्यांचा वारसा चालवताना मला कशाचीही लालसा नाही. माझे ध्येय स्वच्छ आणि प्रामाणिक कार्यकर्ते देणे आहेत. मला विषाची नाही तर अमृताची वेल लावायची असून परळीचे नाव खाली जाईल असे एकही काम करणार नाही.

काही जण म्हणत आहेत, आम्हाला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारही मिळणार नाहीत. हे खरे आहे. कारण सध्या दहशत आणि माफियाराज वाढले आहे, असा आरोप करून पंकजा मुंडे यांनी त्यामुळे चांगले उमेदवार कसे मिळतील? असा प्रश्नही उपस्थित केला.

रावणालाही आपल्या ताकदीचा गर्व झाला होता. पण वानरसेनेने त्यांचा पराभव केला. पालिका निवडणुकीत स्वच्छ आणि सामान्य कार्यकत्र्यांना उमेदवार करू. ते जनतेची कामे करतील.

मते खरेदी करून लोकांना देशोधडीला लावणार नाहीत, अशा शब्दात थेट नामोल्लेख न करता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तर काही जण म्हणतात की उचक्या लागतात, चांगल्या गोष्टीबद्दल ठीक आहे. पण आज शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही. कोणतेही काम नाही, टोल द्यावा लागतो. हे कशाचे द्योतक आहे? पूर्वी राजाच्या मुलाला बदलण्याची संधी मिळत नसे. लोकशाहीत मात्र पाच वर्षांला मतदानातून आपला राजा बदलण्याचा हक्क जनतेला आहे.

लोकशाहीतील लोकप्रतिनिधी राजाने काही पथ्य पाळली, तर जनतेला आदर वाटेल. पाच वर्षांपूर्वी लोकांनी संधी दिली.

सत्तेच्या माध्यमातून अनेक कामे केली. लोक आता त्याची आठवण सांगतात. त्यामुळे काही मिळवण्यासाठी नाही तर लोकांसाठी काम करायचे आहे. त्यासाठी साथ द्यावी, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.