लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही. ४८ मतदारसंघापैकी महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. कारण लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपाने राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजपा मोठ्या मताधिक्यांने जिंकेल अशी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय झाला.

या पराभवासंदर्भात बोलताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी आता सूचक विधान केलं आहे. ‘पात्रता नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं. मात्र, त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली. पण त्यांना सोडणार नाही’, असा थेट इशारा नाव न घेता प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला. त्यामुळे चिखलीकर यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे आहे? याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी; उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज? म्हणाले, “परस्पर उमेदवार…”

प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले?

“आपण लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. एकाही कार्यकर्त्यांच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही. मात्र, कारणं खूप वेगळी आहेत. अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी काय चर्चा होती? नांदेडची जागा दोन लाखांनी निवडून येईन. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यानंतर असं वाटलं की आपलं लीड आणखी वाढेल. पण ही फक्त आपली एक भावना होती”, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं.

ते पुढं म्हणाले, “यामध्ये असं झालं की नगरपालिका आणि महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षांच्या जुन्हा कार्यकर्त्यांना असं वाटलं की अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेले लोक आपल्या छातीवर बसतील. मग आपण काम करून काय फायदा? त्यामुळे कदाचित त्यांनी काम केलं नसावं. तसंच अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना वाटलं असेल की आपलं काही नाही. आपण तर आत्ताच आलो आहोत. यामध्ये नांदेडमध्ये लोकसभेला कमी मतदान झालं, असं माझं मत आहे,” असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही

“माझा त्यांच्यावर राग नाही. मी कोणावरही राग व्यक्त करणार नाही. एक दोन लोक आहेत, त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही. ज्यांची पात्रता नसताना पक्षाने त्यांना मोठं करण्याचं काम केलं. अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी केली. ही या निवडणुकीतील चुकीची गोष्ट आहे. जय-पराजय सोडून द्या. पण आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं”, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एका बैठकीत म्हटलं. दरम्यान, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे आहे, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.