औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने मात्र शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपासोबत सत्तेत असताना हा प्रस्ताव का पाठवला नाहीत अशी विचारणा करत तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का? असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. भाजपासोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेस शिवसेनेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही? हा खरा सवाल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय. काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल राम कदम यांनी केला.

दरम्यान, त्याआधी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नामांतराच्या मुद्द्यावर भूमिका मांडत भाजपावर टीकास्त्र डागलं. “औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले, त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका!”, असा सवाल ‘सामना’तून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ram kadam slams uddhav thackeray led shivsena over aurangabad sambhajinagar issue congress ncp vjb
First published on: 02-01-2021 at 15:44 IST