“केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर मग इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी”, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली. सध्या दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा विषय पेटला आहे. विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या साऱ्या मुद्द्यावर भाजपाकडून कडाडून टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याची एकही बैठक नाही. पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषग्रस्त झाला आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी मूठमाती दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहेत. शेतकऱ्यांची दुरवस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे. आणि हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा. पण मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी लाचारी पत्करणारे बच्चू कडू घरातला अंधार दूर न करता दिल्लीत उजेड पाडायला निघाले आहेत”, अशी टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली.

“मेळघाटातील गडगा प्रकल्प १५० कोटींहून ४५० कोटींवर पोहोचला. राणापिसा आणि हिराबंबई प्रकल्प ठप्प आहे. मेळघाटात बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आमदार आहे. तरीही हे प्रकल्प ठप्प आहेत. पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंडाचे वाटप होऊन वर्ष झाले. मात्र, नागरी सुविधांची कामे झालेली नाहीत. बच्चू कडूंच्या बेलोरा या स्वतःच्या गावचा सिंचन प्रकल्प रखडला आहे. त्यांच्या मतदारसंघातील पांढरी, बोरडी, वासनी, राजुरा सर्व प्रकल्प कुलूपबंद आहेत. बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेर धामना, पूर्णा बॅरेज, नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात लोवर पैनगंगा आणि खर्डा तर बुलढाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकऱ्यांचा कळवळा दाखवण्यासाठी नौटंकी करणारे बच्चू कडू पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्री मंडळात मूग गिळून गप्प बसले आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader shivray kulkarni slams bacchu kadu says he is saving his ministry at any cost vjb
First published on: 06-12-2020 at 17:59 IST