Raj Thackeray statement on Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याबाबत एक सूचक विधान केले. त्यानंतर काही तासातच उद्धव ठाकरे यांनीही या विधानावर प्रतिक्रिया देत एकत्र येण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच त्यासाठी काही अटी ठेवल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे प्रतिक्रियांचे वादळ घोंगावू लागले. अनेक राजकीय पक्षांनी या विषयावर आपापली भूमिका मांडली. तर भाजपाच्या नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया देत या विषयाला बगल दिली.

राज ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे.”

भाजपाकडून काय प्रतिक्रिया उमटली?

राज ठाकरेंच्या या विधानाबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, दोघे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्रासाठी किंवा हिंदुत्त्वासाठी हे एकत्र येत नसून स्वतःच्या अस्तित्त्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम घेत आहेत. उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आले आहेत. आम्ही त्यांना जिहादी हृदयसम्राट म्हणतो. म्हणूनच काहींनी महाकुंभवर टीका करत उद्धव ठाकरेंना खूश केले. हे दोघे एकत्र येऊन हिंदुत्त्वाला आव्हान देणार असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत.

दोघांनाही जनतेने नाकारले

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ठाकरे बंधूचे विधान पूर्णपणे राजकीय आहे. जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारल्यामुळे त्यांना आता हे सुचत आहे. कुठलेही दोन राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांनी त्यांच्या अटीवर चर्चा करावी आणि एकत्र यावे. पण महाराष्ट्राच्या हिताचा यात काही संबंध आहे, ही वस्तूस्थिती नाही. दोघांनाही जनतेने नाकारले आहे. त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची गरज वाटत असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचीही साद

राज ठाकरेंनी एकत्र येण्याची साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “आमच्यात भांडण नव्हतेच, पण तरीही आमच्यातील भांडणे मिटवून टाकल्याचे मी जाहीर करतो. सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपाबरोबर जायचे की माझ्याबरोबर यायचे? मग काय द्यायचाय तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी अट आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.