विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरु आहे. भाजपा आणि शिंदे गट अजित पवारांविरोधात आंदोलनही करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य!’ असा अग्रलेख लिहण्यात आला होता. पण, या अग्रलेखात वापरण्यात आलेला मजकूर विकिपीडियावरून कॉपी करुन घेतल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच, ‘हीच का ती रश्मी ठाकरेंच्या सामनाच्या संपादकाची हुश्शारी!’, असा टोला संजय राऊतांना भाजपाने लगावला आहे.
महाराष्ट्र भाजपाने ट्वीट करत पुरावाच दाखवला आहे. ट्वीट करत म्हटलं की, “वा रे सर्वज्ञानी संजय राऊत कार्यकारी संपादक साहेब! चक्क विकिपीडियावरील मजकुराची कॉपी करुन अग्रलेखात वापरावी लागणे, हीच का ती रश्मी ठाकरे यांच्या सामनाच्या संपादकाची हुश्शारी..! दुसऱ्यांना आत्मपरिक्षणाचे धडे देणाऱ्यांनी किमान स्व ज्ञानात भर घालावी,” असा टोमणा भाजपाने लगावला आहे.
हेही वाचा : “छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी भूमिका पण धर्मवीर…” अजित पवार नेमकं काय म्हणाले?
कॉपी करण्यात आलेल्या मजकूरात काय लिहलं आहे?
३ जानेवारीला ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य!’ या प्रसिद्ध झालेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं की, “शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांत जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण, स्वाभिमानी संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी पंत दत्तोंच्या कारभारास संभाजी महाराजांचा विरोध होता.”
“अण्णाजी पंतांचा कारभार स्वराज्यासाठी योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरीही शिवाजी महाराजांनी अण्णाजी पंतांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. कारण अण्णाजी हे अनुभवी व कुशल प्रशासक होते, पण संभाजीराजांना ते मान्य नव्हते. त्यामुळे अण्णाजी पंत दत्तो व इतर मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.”
“अण्णाजींच्या गुप्त इशाऱ्यांमुळे दरबारातील इतर मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. यामागे अण्णाजी पंतांचे कारस्थान होते. पंतांच्याच विरोधामुळे संभाजीराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यामुळे अत्यंत नाइलाजाने शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले,” असं अग्रलेखात लिहण्यात आलं आहे.