सोलापूर : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्यात हिंदूंवर उचलले जाणारे हात कापून काढावे लागतील. औरंगजेबाच्या पिलावळीकडून आजही प्राचीन हिंदू मंदिरांना धोका आहे. पाकिस्तानात जेवढे अतिरेकी नाहीत, तेवढे गद्दार भारतात आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आयोजित हिंदू विराट सभेत पडळकर बोलत होते. एरव्ही, सामाजिक तेढ निर्माण करणारी विधाने करण्यात अग्रेसर राहिलेले मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे या सभेस उपस्थित होते. परंतु भाषणात आमदार पडळकर यांनी राणे यांना मागे टाकल्याचे दिसून आले.आमदार पडळकर यांनी आपल्या भाषणात नितेश राणे यांचे कौतुक केले. ते खरे डॉन आहेत. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, असे ते म्हणाले. मुस्लीम समाज आता काँग्रेस पक्षालाही मानत नाही. इंग्रजांपेक्षा हे वाईट लोक आहेत. परंतु हे काँग्रेसलाही कळले नाही, असेही विधान त्यांनी केले. मुस्लीम समाजाला लोकसंख्या नियंत्रणाचे कोणतेही गांभीर्य नाही. त्यासाठी मुस्लीम जन नियंत्रण कायदा लागू व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेने सर्वांना एक सारखा न्याय दिला आहे. त्यामुळे घटना मान्य करायला हवी, असे मत व्यक्त केले. मात्र याचवेळी, देशात जोपर्यंत भगवा फडकणार, तोपर्यंतच हिंदू सुरक्षित राहणार, असे विधान त्यांनी केले. या सभेत अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, कर्नाटकातील आमदार बसवनगौडा पाटील आदींनीही जहाल शब्दात हिंदुत्वाचा पुरस्कार केला.